Sunday, June 03, 2007

माझा पहिला सत्याग्रह

भुर्जीवर लिहून एक वर्ष झाले. ह्या लाम्बलचक व्यत्ययाचे कारण एकच - शुद्ध आळस. दुसरे काहीही नाही. इन्ग्रजीमध्ये मजकूर टाईप करणे, मग त्याचे देवनागरीकरण करणे आणी मग पोस्ट करणे..... कशाला नसती उठाठेव?

पण काल माझ्या इन्ग्रजी ब्लॉगच्या एका पोस्टवर एक प्रतिक्रिया मिळाली जिच्यामुळे बालफणीचा एक "किस्सा" आठविला. तो किस्सा मी इन्ग्रजी ब्लॉगवर पोस्ट केला आहे पण त्यास पूर्ण न्याय फ़क्त मराठीतच मिळू शकेल. तर लोकहो! सन्त तुकारामान्च्या शब्दात म्हणायच तर...... आय ऍम बॅक.

किस्सा साधारण १९९० सालचा आहे. मी माझ्या आजीबरोबर तिच्या भजनीमंडळाच्या जेवणाच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. एका कोणत्यातरी आजींच्या घरी भरपूर आज्या आणी त्यांची ढीगभर नातवंडे. त्यातला एक नातू मी. वय वर्षे दहा. सर्व आज्या स्वयंपाकघरात पाकक्रीडेत व वाचाळक्रीडेत व्यस्त तर आम्ही पोरं-सोरं खेळक्रीडेत व्यस्त. आज्यांचा बहुतेक स्वयम्पाकपेक्शा गप्पांवर अधिक जोर असल्यामुळे एक वाजेपर्यन्त देखील भाज्या, आमटी, मसालेभात, कोशिम्बीर... वगैरे पदार्थ तयार होण्यास बराच वेळ होता. तयार होते ते फ़क्त पुर्यान्चे पीठ आणी श्रीखंड.

आम्ही पोरं "भूक लागली" चा कांगावा करायला लागलो. ह्या कांगाव्याला शांत करण्यासाठी आज्यांने एक "पॉलिसी डिसीझन" घेतले - पोरांची पंगत बसवून त्यांना श्रीखंड-पुरी वाढणे. पोरं खुष. आज्या खुष. पण केन्द्रीय सरकारच्या "पॉलिसी डिसीझन" प्रमाणे हा निर्णय देखील सर्व आशिलान्च्या गरजा लक्षात न घेता घेतला गेला होता.

आम्ही पोरं बसलो. ताटे मांडली गेली. आणी दोन आज्या श्रीखंड व पुरी घेऊन आल्या. दोन्ही पदार्थ वाढली गेली. आणी सर्व पोरं त्यांचा फ़डशा पडण्यात व्यस्त झाली.

सर्व पोरं? नव्हे! मी मात्र कशालाही हात न लावता स्वयंपाकघराच्या दाराकडे पाहात बसलो. दहा मिनिटांने त्या दोन आज्या दुसरी वाढ देण्यासाठी आल्या. पहातो तर काय? पुन्हा फ़क्त श्रीखंड पुरी? हे सर्व आनंदाने खाणार्या मुलांमध्ये मी म्हणजे एखाद्या मुहर्रमच्या ताजियामध्ये अडकलेल्या शिवसैनिकासारखा त्रस्त दिसत होतो. एका आजीचे माझ्याकडे लक्श गेले व तिने मला विचारले -

"बाळ, तू जेवत का नाही? पटापटा जेव पहू. शहाणा नातू ना तू? बघ श्रीखंड किती छान आहे."

मी आधी त्या श्रीखंडाकडे एक कुत्सित कटाक्श टाकला. मग त्या आजीकडे एक कुत्सित कटाक्श टाकला.

"मला श्रीखंड आवडत नाही. मला खरं जेवण पाहिजे."

"खरं जेवण म्हणजे?" आजींने विचारले.

"खरं म्हणजे काहीतरी खारं. भाजी, आमटी, भात वगैरे काहीतरी"

"तुला श्रीखंड पुरी आवडत नाही?" आजी "पी एस पी ओ नही जानता?" च्या चालीत उद्गारल्या. मी नकारार्थी मान डोलावली. त्या भल्या म्हातारीने स्वयंपाकघराकडे तोंड करून आरोळी दिली -

"सबनीसबाईंच्या नातवाला श्रीखंड नाही आवडत. त्याला काय द्यायचे जेवायला?"

पुढच्या दोन मिनिटात आक्खा आजीगण माझ्या समोर उभा होत. पेशवे पार्कातल्या एखाद्या नवीन अजब प्राण्याकडे पहावे तसे पाहून मला प्रत्येक आजी विचारत होती "खरंच नाही आवडत?"

ह्या आज्यांच्या घोलक्यातून माझ्या जन्मदात्याची जन्मदात्री पुढे आली व तिच्या कणखर आवाजात म्हणाली,

"गौरव! गपचुप वाढलय ते खा पाहू. कशाला तमाशा करतोयेस?"

"पण आजी, तुला माहिती आहे मला हे आवडत नाही. आपल्या घरी तरी कुठे खातो मी श्रीखंड?"

तेवढ्यात एका घार्या-गोर्या म्हातारीने आपला घारे-गोरेपणा सिद्ध करीत म्हटलं -

"अरे पण हे श्रीखंड काही तुझ्या आजीने नाही बनविले. पहा खाऊन. चांगले आहे."

हा शेरा ऐकून माझ्या आजीचा पारा अजूनच चढला आणी त्या आगाऊ म्हातारीचा राग माझ्यावर काढीत ती ओरडली -

"श्रीखंड खा नाहीतर धपाटा खा"

कदाचित शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकातल्या गान्धी-कौतुकाच्या अतिरेकामुळे मी पण छाती फ़ुगवीत ओरडलो -

"धपाटा खाईन पण श्रीखंड खाणार नाही!"

तेवढ्यात एक समजुतदार आजी माऊंटबॅटन च्या अविरभावाने मध्ये आली व म्हणाली

"आहो सबनीस बाई. शांत व्हा. हे बघ बाळ" मला उद्देशून ती म्हणाली "नसेल खायचे श्रीखंड तर नको खाऊस. पन बाकी सगळं तयार व्हायला दोन तास तरी लागतील. थांबशील तोपर्यंत?"

माझा सत्याग्रही बाणा साबूत राखित मी म्हणालो,

"दोन तास थांबेन पण श्रीखंड खाणार नाही!"

"ठीक आहे मग. रहा उपाशी दोन तास." माझी आजी म्हणाली. आणी खिदळणार्या म्हातार्यांबरोबर स्वयंपाकाकडे चालती झाली.

दोन तासांने मी आज्यांच्या पंक्तीत जेवलो. श्रीखंडाला हात देखील लावला नाही.

त्या घटनेनन्तर आजसुद्धा त्यातली कोणतीही आजी रस्त्यात भेटली तर विचारते,

"काय रे? अजूनही श्रीखंड खात नाहीस का?"

आणी मी ओशाळत म्हणतो "नाही".